Follow Us @soratemplates

Tuesday, 28 June 2016

03:30 0 Comments

अनेक वर्ष नसूनही संपर्कात...

आपण असतोच रे एकमेकांच्या “टच” मध्ये..

कारण खरा “टच” हा आतून होत असतो..

चुकीच्या साईडने ओव्हरटेक केल्यावर..

चादर घालताना सुरकुत्या पडल्यावर

फ्रीज मधून काढून तसंच उभ्या उभ्या गार आमटीभात खाल्यावर...

तू नाराज झाला आहेस, हे जवळपास दिसतंच मला.. तू समोर नसूनही...

आमरस खाताना समाधानाचे हुंकार भरल्यावर,

पाऊस आल्यावर सगळं टाकून बाहेर धावल्यावर

सिग्नल सुटता सुटता घाईत मोग-याचे गजरे घेतल्यावर

तुलाही येतच असेल ना माझी आठवण....

माहित असतं आपल्याला

अशा वेळी तू किंवा मी काय react झालो असतो ते...

कारण जो काही काळ खरोखर एकत्र होतो आपण...

त्या दिवसांच्या सवयी लकबी आणि जाणिवांचे tattoos

गोंदवलेत आपण मनावर तेव्हाच...

आपण एखाद्याला ओळखतो म्हणतो, तेव्हा

त्या माणसासोबत घालवलेल्या क्षणांचे अल्बम्स पुन्हा चाळत असतो बस...

कदाचित त्या अल्बम मधला माणूस आता तसा दिसत नसेलही..

पण तो जेव्हा असा दिसायचा, तेव्हा आम्ही एकत्र होतो...

तू हि अजून तसाच दिसत असशील तर ठीकेय..

नाहीतर चल, भेटू पुन्हा.. आणि नवीन “सेल्फी” काढून घेऊ...

जाणिवांच्या अल्बम मध्ये अपलोड करण्यासाठी...
आश्विनी शेंडे