Follow Us @soratemplates

Friday, 20 September 2013

डोहाळजेवण प्रसंगी गाणी व उखाणे ......

04:09 0 Comments
ओटी भरण आज कौतुकाचे
हवे नको काय ते तूच सांगायचे
ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।।

शालू हिरवा जरतारी काठ
चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट
श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।।

मोगरा अंबोली, दवणा मरवा,
रूपाराणीला या, मखरी मिरवा,
मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।।

सुगंधित वाळा, उटी चंदनाची
हौस पुरवा फळांची फुलांची,
डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।।

कौसल्येचा राम, देवकीचा शाम,
असेल तयाचे रूप मनोरम,
पडसाद कानी घुंगुर वाळ्याचे ।।४।। 

*********************************

मजेशीर कविता डोहाळे पुरावा ......

कैरी आवळा चिंच न बोर
तुम्हीच मजला आणा
साजण राजा येणार बाळच माझा
इवला सोनुला स्वप्नी आला
खुदुखुदूनी हसला ॥ सानण राजा... ॥

पावभाजी पाणिपुरी
उपमा मजला प्यारा
बदाम काजू मनुकांचा ही
खुराग मजला न्यारा
चाँकलेट, आंबा आईस्किम साठी
व्याकुळ जीव हा झाला ॥ साजण राजा... ॥

भू-भू माऊ अशी खेळणी
नकोच माझ्या बाळाला
रोबो अन काँप्युटर
हवाच त्याच्या दिमतीला
सिडी, फ्लाँपी, चॅटींग, सरफिंग
ह्या शब्दांची माळा
घालाच माझ्या चिमुकल्या राजाला ॥ साजण राजा...॥ 
- सौ. सुषमा मधुकर खरे.
*********************************************

उखाणे 

१) सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी
    ....
चे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी !!!!!

२) मावळला सूर्य, उगवला शशी
    ...
चे नाव घेते, डोहाळ जेवणाच्या दिवशी !!!!!

३) चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ
    ...
चे नाव घेते, केला डोहाळ जेवणाचा थाट !!!!!

4) रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
......
ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.
5) बाळराजांची चाहुल दरवळला परिसर,
.....
च्या सहवासात माझे जीवन होईल सफल
6) संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट,
.....
राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट 

डोहाळजेवण.......

04:05 0 Comments
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो. सगळ्यांना हवीहवीशी गोड बातमी कानावर येते. सगळ्यांच्या मनात आनंद उत्साह. तिच्याही मनात असतो अपार आनंद. पण त्याबरोबर असते एका कोपऱ्यात कुठेतरी एक अनामिक भीती, थोडं जवाबदारीचं ओझं. पण सगळ्यात सुखद वाटतं ते एकच..."मी आई होणार"

"आई".... अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केले आहेच. पण मला वाटतं "आकलनापलीकडचं ईमान" म्हणजे आई. बाळाशी जी नाळ जोडली जाते ती कायमचीच. बाळ जन्माला आल्यानंतर ती physically कापली तरी वात्सल्याच्या रुपात किंवा काळजीच्या रुपात आई कायम जोडलेलीच राह्ते.

आता हे आईपण येतं कुठून? अत्यंत चंचल, हळवी, असमजूतदार मुलीचं अचानक वास्तल्यमूर्तीत रुपांतर होतं कसं? बाळ पोटात असल्यापासून जपण्याचे संस्कार रुजत जातात. दिसामासांनी जसं ते आकार घेत असतं तसंच तिच्याही नकळत तिच्यातलं आईपण जन्माला येत असतं.

डॉक्टर, सोनोग्राफ़ी, iron, folic, गर्भसंस्कार, व्यायाम सगळं काही सुरु होतं. बाळगुटी, शेक , खाणंपिणं यावर सगळ्यांचे सल्लेही सुरु होतात. How to develop your baby's intelligence? असे क्लासही सुरु होतात. पण ह्या सगळ्यात आई कसं व्हायचं हे कुणीच शिकवत नाही. आता तुम्ही म्हणाल त्यात शिकवायचं काय?. .... पूर्वीची गोष्ट वेगळी होती. मुलात मूल वाढत होत. जेवत होतं शिकत होतं. पण सध्याच्या जमान्यात सगळं काही Best देण्याच्या मागे फ़िरताना होणारी दमछाक वेगळी आहे. अनेक भावंडांवरुन एकुलत्या एक अशा उरलेल्या पिढीवर अपेक्षांचा डोंगरही तेवढाच मोठा आहे. Cut Throat competition आणि Reality shows च्या गराड्यात बालपण हरवतय. आई होणं म्हणजे ह्या सगळ्याचं जाणतं भान असणं. झापडं लावून पळण्याऐवजी का? हा प्रश्न पडणं गरजेचं आहे. Ready, Instant, immediate असं सगळं हवं असताना मूल वाढवताना लागणारा Patience शिकवणं गरजेचं आहे. मुबलक पैसा आणि सुबत्ता असली तरी ’नाही" म्हणण्याचा अधिकार शिकवणं गरजेचं आहे.

बाळासाठी जीव तुटत असताना स्वत:च्या करियरची होणारी ओढाताण, शाळांचे प्रवेश, अवास्तव मागण्या, मुलांचे हट्ट, सगळीकडे सगळं पुरवताना "आई" ची होणारी ससेहोलपट खरंच अवघड आहे.

ह्या सातव्या महिन्याच्या उंबरठ्यावर डोहाळजेवणाच्या निमित्ताने हे सगळं बोलावसं वाटलं. फ़ुलांनी सजवताना, झोपाळ्यावर झुलवताना प्रार्थना एवढीच की तुझी चित्तवॄत्ती आनंदी राहू दे. दोह्रुद असलेल्या तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. सगळं काही सुखरूप होईलच. आईपण येतंच ते सजगपणे निभावण्यासाठी हा सारा अट्टाहास. नऊ महिने होणारे सगळे कष्ट त्या इवल्याशा जिवाच्या दर्शनाने शमतात आणि मनातल्या सगळ्या प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळतात.



सुखावलेल्या धरतीत जेव्हा अंकूर रुजतो
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

स्वप्नं फ़ुलतात,
डोहाळे लागतात,
इवलीशी पावले चाहूल देतात
धडधडत्या काळजाचा नाद सुरु होतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

कसं होईल? काय होईल?
अगणित प्रश्नांची घाई
कळा देताना खूप खूप
दुखतं का गं आई ?
सगळं काही सोसायचं बळ जेव्हा येतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

थोडी चिडचिड होते
थोडी तडफ़ड होते
करियर की बाळ
अशी स्पर्धा सुरु होते
इवल्याश्या जिवणीचाच मोह जडू लागतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

ते हसणं ते बोलणं
ते रांगणं नि धडपडणं
काळजीच्या काजळीनं
काळजाला गाठणं
सुखाचा अश्रू जेव्हा डोळ्यालगत येतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

पळू नकोस लागतं
हे सांडतं ते भाजतं
जरा थोडं ऐकलं तर
सांग तुझं कात जातं
माझ्यातल्या आईला जेव्हा माझ्या आईचं मन कळतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं 

Thursday, 5 September 2013

शिक्षक दिन

02:08 0 Comments
   डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.
           वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. जो देतो तो देव. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडून असते.

 जे जे आपणासि ठावे | 
 ते  ते दुसर्‍यांस सांगावे |
 शहाणे करून सोडावे सकलजन | 
अशी वृत्ती शिक्षकाची हवी. त्यामुळे मुळात शिक्षकाकडे माहितीचा खजिना असणे आवश्यक आहे. निदान ही माहिती कोठून मिळवायची याचे मार्गदर्शन तरी आजच्या काळात शिक्षकाला करता आले पाहिजे. आज चहुबाजूंनी माहितीचा प्रचंड स्फोट होत आहे. नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल होत आहेत. वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. त्याची माहिती शिक्षकाने करून घेणे गरजेचे आहे. पुर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात महदंतर आहे. पूर्वी गावात शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान , अशी परिस्थिती होती. कोर्‍या करकरीत  मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत. आज विद्यार्थ्याच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटके, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाइल आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्याच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने  ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षकाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे. एखादी पूर्णत: नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे  अवघड असते. म्हणून विद्यार्थ्याला माहीत नव्हते, ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याच्याजवळील माहितीच्या साठ्याचा त्याने कसा उपयोग करून घ्यावा यचे मार्गदर्शन करून; त्याला योग्य मार्गाने  आचरण करयला लावणे; म्हणजे शिक्षण हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे .एक निकृष्ट शिक्षक 'सांगत जातो.' सामान्य शिक्षक 'स्पष्टिकरण करतो.' चांगला शिक्षक 'प्रात्यक्षिक' करतो. तर खरा शिक्षक 'प्रेरणा' देतो.  आणि म्हणून विद्यार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी शिक्षकाने स्वतः उत्साहाने सतत शिकत राहिले पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्याला स्वतःला ओळखयला शिकवले पाहिजे. त्याच्यातील त्रुटी, त्याच्या क्षमता त्याला दाखवून विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम शिक्षकांनी करावे. आज शिक्षक केवळ वर्गात शिकवणारी, अभ्यासक्रम  पूर्ण करणारी व्यक्ती न रहाता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारी जबाबदार व्यक्ती बनायला हवी. असा विद्यार्थी घडवण्याची जबबदारी पार पाडण्यासाठी प्रथम शिक्षकाने स्वतःच स्वतःला घडवावे म्हणजे स्वतः शिक्षकाने चारित्र्यवान असावे.तरच तो चारित्र्यवान विद्यार्थी घडवू शकेल.
            शिक्षक म्हटले की मला आठवतात धनानंदाच्या जुलमी  राजसत्तेला उलथवून टाकणारे आर्य चाणक्य. शिक्षक म्हटले की मला आठवतात, देशप्रेमाने भारलेले; देशस्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले लोकमान्य  टिळक आणि आगरकर. शिक्षक म्हटले की मला आठवतात, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी झटणारे तुकाराम , ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदासादि संत. शिक्षक म्हटले की मला आठवतात आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणार्‍या अनुताई वाघ. आज समाजाला अशा शिक्षकांची  खरोखर गरज आहे. भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, दांभिकपणा, अन्याय, अत्याचार, या सार्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे रहाणारे, समाजाला अगदी हीन अवस्थेप्रत नेण्यास कारणीभूत ठरलेले नेते, अभिनेते व तथाकथित राजकारणी, सनदी अधिकारी यांना निर्भयपणे धडा शिकावण्यास सज्ज असलेले,  दिशाहीन बनलेल्या विद्यार्थांच्या पाठीवर प्रेमळ हात फिरवून त्यांना मार्ग दाखविणारे आणि त्यांच्यावरिल अन्यायाला विरोध करण्यास त्यांना सहकर्याचा हात देणारे, असे शिक्षक आज मी शोधते आहे. पण क्वचित कुठे असे काजवे मिणमिणताना दिसतात. बाकी सारे पैशाच्या मागे लागलेले शिक्षक व्यावसायिकच नजरेला पडताहेत. या सर्व मिणमिणत्या काजव्यांनी एकत्र येऊन समाजाची घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करावा आणि आजचा शिक्षकदिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वात उच्च बनवण्यासाठी कार्यरत व्हावे; हीच राधाकृष्णन यांना आदरांजली ठरेल.

Wednesday, 28 August 2013

गोपाळकाला

09:11 0 Comments
अर्थ 
गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्‍वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात.

'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत. 
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी) 
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक 
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक 
ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक 
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

इतर फायदे 
शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते. 
सर्व सृष्टीच आनंदी असणे : वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्‍त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.


एक दिवस कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळ्या त्याच्या सवंगड्यांना आवाज दिला अन् सर्वांना आपापल्या घरात जे काही शिळेपाळके आहे त्याच्या शिदोर्‍या घेऊन रानाकडे कूच करण्यास सांगितले. दुपारी गाईंना चरावयास सोडल्यावर सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल? 

कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले. 

त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. त्या काल्याच्या आठवणीसाठी आजही गोकुळाष्टमीनंतर गोपाळकाला केला जातो. त्यात दही, दूध, लोणचे, लाह्या, कुरमुरे, पोहे पापड इतकेच नव्हे तर त्यात भाकरीही कुसकरून घालतात. खरंच तो काला खाल्ल्यावर एक वेगळीच अविस्मरणीय चव जिभेवर रेंगाळते. इतर दिवशी असे पदार्थ एकत्र केले तर त्यात कदाचित तो रस राहणार नाही. तो कृष्ण भक्तीचा रस, कृष्णाच्या व त्याच्या सवंगड्यांच्या मैत्रीचा रस त्या काल्याला अमृताची गोडी मिळवून देतो.



गोपाळकाला नैव्यद्य

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
४ वाटी ज्वारीच्या लाह्या.
[
चाळणीवर चाळुन घ्याव्यां.नंतर ३-४ वेळा पाण्याने धुवुन घ्याव्या.म्हणजे लाह्यांमधली कचकच निघुन जाईल .धुताना लाह्या चोळु नये.धुतल्यावर चाळणीतच उपसुन ठेवाव्या.]
१ वाटी चणाडाळ आणि अर्धी वाटी दाणे -धुवुन साधारण एक तासभर आधी भिजवुन घ्यावे.भिजलेली चणाडाळ मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावी.
मुठभर पोहे धुवुन घ्यावे.
लहान काकडीच्या बारीक फोडी साधारण पाऊण वाटी..
नारळाचा ताजा चव किंवा किसलेले सुके खोबरे पाव वाटी
अर्धा लिटर दह्याचे दाटसर ताक.
हिरवी मिरची २ ते ३ बारीक चिरलेली..तिखट आवडत असेल तर जास्त घालावी.
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी .
किसलेले आले १ टेबलस्पुन.
साखर चवीप्रमाणे.दही आंबट असेल तर साखर जास्त लागेल. मीठ चवीप्रमाणे.
मुरलेल्या लिंबाच्या लोणच्याच्या २ फोडी व थोडासा खार.
८-१० तुळशीची पाने हाताने तोडुन घ्यावी.बेसिल ची पानेही चालतील.
क्रमवार पाककृती: 
ही सर्व तयारी असली कि, गोपाळकाला लगेच तयार करता येतो.हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करुन शेवटी ताक घालावे.व छान कालवावे.
आस्वाद घेण्यासाठी तयार आहे " गोपालकाला"

श्रीकृष्ण जन्माष्टमी

08:52 0 Comments
जेव्हा अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. त्यावेळी ही तसंच झालं.
मथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला जेव्हा प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही, त्याने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदीशाळेत टाकले. कां तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्यानं ऐकली होती. आपला शत्रू जन्मताच नाहिसा करायचा, मारून टाकायचा, म्हणून कंसान देवकीची बाळ मारून आपल्या माथी बाल हत्येच पाप घेतलं. बालकाची निर्घुण हत्या केली, तेव्हा देवकीपोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू ह्यांनी श्रीकृष्ण रूपाने आठवा अवतार घेतला.
श्रावण वध अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात.
कृष्ण हा भगवान महाविष्णू ह्यांचा आठवा अवतार. त्या अवताराची प्रगटन तिची अष्टमीच. ह्या अवताराच प्रमुख कार्य म्हणजे धर्म रक्षण, भक्त भाविक सज्जन ह्यांच रक्षण अन दुर्जनांना शासन करणं हेच होय. कौरव पांडवाच्या मधलं ते महाभारत घडू नये म्हणून श्रीकृष्णानाने खूप प्रयत्न केले पण…
अखेर कृष्णाला सत्त्याच्या बाजूने, धर्माच्या बाजून म्हणजेच पांडवांच्या बाजूनेच युद्धांत उतरावे लागले. पांडवाच्या बाजूने राहून श्रीकृष्णा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. कपटी अन कुटिल कारस्थानी कौरवांचा पराभव केला.
श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले. गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांच त्यानाच कळत नाही.
श्रीकृष्ण चरित्र हा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा, अनुकरणाचा विषय आहे. अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच. मूठभर पोह्यांसाठी आपल्या मित्राला सुवर्ण नगरी करून देणारा हा कृष्णच. तो असा अर्जुनाचा सखा, मार्गदर्शक तसाच भोळ्या भावड्या भक्ताचा संरक्षक-मार्गदर्शकही. त्या दुष्टांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या संरक्षकाची आपल्याला सदैव आठवण रहावी. ती आठवा श्रीहरी आपण आठवावा म्हणून हा कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
दुसर्‍या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नव. युवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो.

Wednesday, 21 August 2013

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय........

02:23 0 Comments

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय
नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी.व्ही. पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार्या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर, पिज्झा, फ़्राईस आणि आईसफ्रूट
खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात!
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...

साधे सोपे जीवन ....

02:08 0 Comments


साधे सोपे जीवन 
आयुष्य हे साबणाच्या फुग्यांसारखेच असते क्षणिक ... बनवणारा अनेक फुगे बनवत असतो ... काही मोठे, काही छोटे, काही जास्त चमकणारे, काही बनल्या क्षणीच नष्ट होणारे तर काही अपेक्षे पेक्षा उंच उंच जावून आपले अस्तित्व दाखवणारे ... पण सर्वात साम्य एकच आहे कि सर्व जीवनाच्या आणि वेळेच्या दिशेने एकसर जात असता ... कोणी ही हां नियम तोडू नाही शकत ना तोडतो .... माणसाचे पण असेच आहे जन्माच्या वेळी देश,धर्म,जात,रंग, रूप, श्रीमंती ही आपल्याला निवडता नाही येत ... आपले अस्तित्व काही दिवसांचे का शंभरीचे हे पण ठरवता नाही येत पण बनवणारा एकच आहे आणि त्यानेच ही विविधता बनवली आहे ... तिला हिणवने आणि नाकारणे म्हणजे आपला आयुष्याचा नश्वर प्रवास वाया घालावने .. जो फुगा वारा आणि निसर्गाशी सामावून स्वतः ला झोकुन देतो तोच जास्त उंच जावून ह्या प्रवासाची जास्त मजा घेतो ... प्रवास तर अटळ आहे फक्त करायचा कसा हे आपला दृष्टिकोण ठरवत असते ... जीवन पहायचा दृष्टिकोण हे जिवनातील ज्ञानाहुन मोठा असतो आणि तो विद्वाना कड़े पण असेल ह्याची शास्वती कोणी देऊ नाही शकत कदाचित रस्त्यावर राहणारा पण तो शिकवून जावू शकतो ....