Follow Us @soratemplates

Friday, 26 September 2014

हादग्याची गाणी /भोंडल्याची गाणी

04:05 0 Comments
हे पहिले गाणे

१) आधी नमुया श्री गणराया

आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया, तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया....

2)श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं 

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं 
असं कसं वेड माझ्या कपाळी आलं 

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले 
चेंडू चेंडु म्हणून त्याने खेळायला घेतले 

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिला 
केरकचरा म्हणून त्याने फेकून दिला 

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या 
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या 

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या 
चक्र चक्र म्हणून त्याने बोटात घातल्या 

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले 
स्नो स्नो म्हणून त्याने अंगाला फासले 

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या 
अळी अळी म्हणून त्याने टाकून दिल्या 

वेडयाची बायको झोपली होती 
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले 
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले

 3 शिवाजी अमुचा राजा

शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे सात कमळे
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार... घेऊनी आला...( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.
हादगा देव मी पूजिते
सख्यांना बोलाविते
लवंगा, सुपार्‍या, वेलदोडे
करून ठेवले विडे
आणिक दुधाचे दुध पेढे
वाहून हागद्यापुढे

4 ऐलमा पैलमा गणेश देवा


ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडुन दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, 
पारवे घुमती बुरजावरी 

गुंजवाणि डोळ्याच्या सारविल्या टिका, 
आमच्या गावच्या भुलोजी नायका 

एवि निघा तेवि निघा, कांडा तीळ बाई तांदुळ घ्या 
आमच्या आया, तुमच्या आया, खातील काय दुधोंडे 

दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे रे वनमाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता 

पड पड पावसा थेंबो थेंबी, थेंबो थेंबीच्या आळव्या लोंबी
आळव्या तुझी सात कणसं, भोंडल्या तुझी सोळा वर्ष 

अतुला मातुला चरणी घातूला, चरणीचे सळसोंडे, 
हातपाय खणखणीत गोंडे

एक एक गोडां विसा विसाचा, साड्या नांगर नेसायचा 
नेसा ग नेसा बाहुल्यांनो, विस वर्ष पावल्यांनो 

5 कृष्ण घालितो लोळण

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
'आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून'
"असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं"
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
'आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून'
"असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं"
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

6. एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलू


एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलू 
दोन लिंबं झेलू बाई, तीन लिंबं झेलू  

तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू  
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलू 

पाचा लिंबांचा पानवडा, माळ घाली हनुमंताला  
हनुमंताची निळी झोळी, येता जाता कमळं तोडी

कमळाच्या पाठीमागं लागली राणी 
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ? 

पाणी नव्हे यमुना जमुना, 
यमुना जमुनेची बारिक वाळू, तेथे खेळे चिलारी बाळ  

चिलारी बाळाला भूक लागली  
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजले पाटावरच्या घडीवर निजवलं

नीज रे नीज रे चिलारी बाळा, मी तर जाते सोनारवाड्‍या
सोनारदादा सोनारदादा गौरीचे मोती झाले कां नाही ? 

गौरीचे मोती तांब्याच्या चुली, मांडव घातला मखमख पुरी
लगीन लागलं सूर्योदयी, भोजन झालं आवळीखाली 

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली, शेणगोळा आंब्याखाली 
पानसुपारी तुळशीवरी, वरात निघाली हत्तीवरी

7.नणंदा भावजया दोघीजणी 


  
नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी ? 

"मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं" 

आतां माझा दादा येईल गं 
दादाच्या मांडिवर बसेन 
"दादा तुझी बायको चोरटी"

"असु दे माझी बायको चोरटी"
"घे काठी घाल पाठी" 

"घेत नाही काठी घालत नाही पाठी 
घरादाराची लक्ष्मी मोठी"

८.दमडीचं तेल आणलं... 

काळी चंद्रकला नेसू कशी, गळ्यात हार घालू कशी, 
पायात पैंजण घालू कशी, दमडीचं तेल आणू कशी, 

दमडीचं तेल आणलं... 

सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची शेंडी झाली, 
भावोजींची दाढी झाली, वन्सं बाईंची वेणी झाली, 

उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, 
वेशीबाहेर ओघळ घेला, त्यात हत्ती वाहून गेला, 

सासूबाई सासूबाई अन्याय झाला 
दुध भात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा.

९.हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली 
त्यातलं उरलं थोडं पीठं त्याचं केलं थालीपीठं 
नेऊनी वाढीलं पंगतीतं जिलबी बिघडली 

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली 
त्यातलं उरलं थोडं दही त्याचं केलं श्रीखंड बाई 
नेऊनी वाढीलं पंगतीतं जिलबी बिघडली 

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभातं 
नेऊनी वाढीला पंगतीतं जिलबी बिघडली 

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुर्‍या छानं 
नेऊनी वाढील्या पंगतीतं जिलबी बिघडली

१०.कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने 

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने 
मग जा अपुल्या माहेरा माहेरा 

कारल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा 

कारल्याला कारली येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने 
मग जा अपुल्या माहेरा माहेरा 

कारल्याला कारली आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा 

कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने 
मग जा अपुल्या माहेरा माहेरा 

कारल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा 

कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने 
मग जा अपुल्या माहेरा माहेरा 

कारल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा 

आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने 
मग जा अपुल्या माहेरा माहेरा 

आपलं उष्ट काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई 
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा 

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा 
आणली फणी घातली वेणी गेल्या राणी माहेरा माहेरा

11."कोथिंबीरी बाई गं,

"कोथिंबीरी बाई गं, आता कधी येशील गं?"
"आता येईन चैत्रमासी"
"चैत्रा चैत्रा लौकर ये 
हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हार्‍यात 
देव्हार्‍याच्या चौकटी, उठता बसता लाथा बुक्की"

12.आड बाई आडोणी 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी 

आडात पडली सुपारी 
आमचा भोंडला दुपारी 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी 

आडात पडली मासोळी 
आमचा भोंडला संध्याकाळी 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी 

आडात पडली कात्री 
आमचा भोंडला रात्री 

आड बाई आडोणी 
आडाचं पाणी काढोणी 

आडात पडला शिंपला 
आमचा भोंडला संपला

12.सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी 

सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी 
यादवराया राणी घरासी येईल कैसी 

सासरा गेला समजावयाला “ऊठ ऊठ मुली चल घराला 
तिजोरीची चावी देतो तुला” 

“तिजोरीची चावी नको मला 
मी नाही यायची तुमच्या घराला” 

सासु गेली समजावयाला “ऊठ ऊठ मुली चल घराला 
अर्धा संसार देते तुला” 

“अर्धा संसार नको मजला 
मी नाही यायची तुमच्या घराला” 

दीर गेला समजावयाला “ऊठा ऊठा वहिनी चला घराला 
नवीन कपाट देतो तुम्हाला” 

“नवीन कपाट नको मला 
मी नाही यायची तुमच्या घराला” 

जाऊ गेली समजावयाला “ऊठा ऊठा जाऊबाई चला घराला 
जरीची साडी देते तुम्हाला” 

“जरीची साडी नको मला 
मी नाही यायचे तुमच्या घराला” 

नणंद गेली समजावयाला “ऊठा ऊठा वहिनी चला घराला 
चांदीचा मेखला देते तुम्हाला” 

“चांदीचा मेखला नको मला 
मी नाही यायचे तुमच्या घराला” 

पति गेले समजावयाला “ऊठ ऊठ राणी चल घराला 
लाल चाबुक देतो तुला” 

“लाल चाबूक हवा मला 
मी येते अपुल्या घराला” 

सासुरवाSसी सुन घरासी आली ऎसी 
यादवराSया राणी घरासी आली ऎसी 

आणा फणी घाला वेणी जाऊद्या राणी सासरी सासरी 
आणली फणी घातली वेणी गेली राणी सासरी 

१३.भोपळीचं फुल बाई फुलरंजना

भोपळीचं फुल बाई फुलरंजना, 
माळ्याचा माळ बाई माळरंजना 

माळ्याने सांडली भिकबाळी, 
हुडकली पण सापडेना, 

पाटाच्या पाण्यातून वाहून गेली 
सर्पा जवळ सापडली

सर्प म्हणे मी एकुला 
दारी आंबा पिकला 

दारी आंब्याची कोय गं 
खिरापतीला काय गं ???

१४.एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला 

एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला 

त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले 
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले 

सईने ते घरात नेले बाई घरात नेले 
कांडून कुंडून राडा केला बाई राडा केला 

राडा घेवून बाजारात गेली बाई बाजारात गेली 
राडा विकून पैसे आणले बाई पैसे आणले 

त्या पैश्यांची घागर घेतली बाई घागर घेतली 
घागर घेवून पाण्याला गेली बाई पाण्याला गेली 

मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला 

आणा माझ्या सासरचा वैद्य 

अंगात अंगरखा फाटकातुटका, डोक्याला पागोटं फाटकंतुटकं 
हातात काठी जळकं लाकूड, कपाळाला टीळा शेणाचा 
तोंडात विडा पादरा कीडा 
दिसतो कसा बाई भिका-यावाणी बाई भिका-यावाणी 

आणा माझ्या माहेरचा वैद्य 

अंगात अंगरखा भरजरी, डोक्याला पागोटं भरजरी 
हातात काठी चंदनाची, कपाळाला टीळा चंदनाचा 
तोंडात विडा केशराचा दिसतो कसा बाई राजावाणी बाई राजावाणी

१५.अरडी गं बाई परडी परडी 

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल सासरा, 
सासर्‍याने काय आणलं ? 
सासर्‍यानी आणल्या पाटल्या 

पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही, 
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई 
झिप्रं कुत्र सोडा गं बाई, सोडा गं बाई 

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल सासू 
सासुनी काय आणलं 
सासुनी आणले गोठ 

गोठ मी घेत नाही, सांगा मी येत नाही, 
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई 
झिप्रं कुत्र सोडा गं बाई, सोडा गं बाई 

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल दीर 
दीरानी काय आणलं 
दीरानी आणल्या बांगड्या 

बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही, 
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई 
झिप्रं कुत्र सोडा गं बाई, सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल जाऊ 
जावेनी काय आणलं 
जावेनी आणली नथ 

नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही, 
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई 
झिप्रं कुत्र सोडा गं बाई, सोडा गं बाई 

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल नणंद 
नणंदेनी काय आणलं 
नणंदेनी आणले पैंजण 

पैंजण मी घेत नाही, सांगा मी येत नाही, 
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई 
झिप्रं कुत्र सोडा गं बाई, सोडा गं बाई 

अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं 
परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं 

दारी मूल पती 
पतीने काय आणलं ? 
पतीने आणलं मंगळसुत्र 

मंगळसुत्र मी घेते, संगे मी येते, 
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई 
झिप्रं कुत्र बांधा गं बाई 

१६ आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला 

आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला 
आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायी 

एवढा डोंगर शोधिला, राम कोठे नाही 
रामं गं वेचीतो कळ्या, सीता गं गुंफीती माळा 

आली गं लगीन वेळा, अंगणी घातिला मंडप 
मंडप मंडप बसते पोती, पोती पोती तिरुबाई राळा
जरतारी घातलं बोहलं, नवरा नवरी बसली पाटी
पोशीन पायी तिरुबाई राळा, तिरुबाई राळा मुंजा बाळा, 

मुंजा बाळाची मुंजक दोरी, तीच दोरी सावध करी, 
सावध सावध सर्वकाळ, सर्वकाळाचा उत्तम दोर, 

दोर बांधा झाडासी, झाड झबका फुल टपका, 
ते बाई फूल तोडावं, बहिणी माथां खोवावं, 

बहिणी तुझे केस गं, मोतीयाचे घोस गं 
बहिणी तुझी वेणी गं, केतकीची फणी गं 
बहिणी तुझा खोपा गं, उंदीर घेतो झोका गं 


१७.आज कोण वार बाई  आज कोण वार? 

आज कोण वार बाई  आज कोण वार? 
आज आहे सोमवार शंकराला नमस्कार  

आज कोण वार बाई आज कोण वार? 
आज आहे मंगळवार गणपतीला नमस्कार 

आज कोण वार बाई आज कोण वार? 
आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार  

आज कोण वार बाई आज कोण वार? 
आज आहे गुरुवार दत्ताला नमस्कार 

आज कोण वार बाई आज कोण वार? 
आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार  

आज कोण वार बाई आज कोण वार? 
आज आहे शनिवार शनिला नमस्कार  

आज कोण वार बाई आज कोण वार ? 
आज आहे रविवार सुर्याला नमस्कार 





Friday, 28 March 2014

बाळासाठी स्तनपान फायदे आणि तोटे

11:55 0 Comments

जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मुलाची वाढ व विकास अधिक गतीने होत असतो. सर्वसाधारपणे मुलाच्या जन्मानंतर त्याचे वजन पहिल्या चार महिन्यात दुपटिने वाढते. तर त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्यात तिप्पटिने वाढ होते. अशी आश्‍चर्यजनक वाढ होण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबरच बाळाला आनंदी वातावरणही मिळाले पाहीजे. त्याच बरोबर वाळ गुटगुटित होण्यासाठी पाणी, जीवनसत्वे, प्रथिने, खनीजे, मेदयुक्त पदार्थ असे जवळपास ४० पौष्टिक घटक त्याला त्याच्या आहारातुन दिले गेले पाहिजेत. गर्भाची पुर्ण वाढ होवून मुलाचा जन्म झालेला असेल तर त्या बालकाच्या शरीरात सुरूवातीला काहीकाळ पुरेल असा पोषक मुल्यांचा विशेषत: पाण्याचा पुरेसा साठा असतो. दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवसापासुन तुमच्या बाळाला पाणी व पोषक मुल्यांची गरज भासत असते.

जन्मापासुन चौथ्या महिन्यापर्यंत स्तनपान :-

‘स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार होय. परंतू काही आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा पहिलटकरणींना पुन्हा त्यांच्या कामास सुरूवार करायची असल्याने त्यांना बाळाला पुरेसे स्तनपान करता येत नाही. अशावेळी काही माता बाटलीतील दुधाची मदत घेतात. ज्या बायका मुलांना अंगावर दुध पाजतात. त्यांना दररोज किमान ५०० कि. ग्रॅ. कॅलरीजचे गरज असते. या शिवाय ४०० मि. ग्रॅ. कॅल्शियम व २० ग्रॅम प्रथिने तिला मिळालीच पाहिजेत त्यासाठी तिच्याआहारात दुध
, दुधाचे प्रदार्थ, अंडी मांस, व ब्रेड मिळालेच पाहीजेत. तसेच ती जेवढ्या प्रमाणात पाणी पिईल तेवढ्या प्रमाणात तिला जास्त दुध सुटेल.

स्तनपानाचे फायदे :- 
मातेच्या दुधात नवजात बालकासाठी आवश्यक ते सर्व पोषकमुल्य असतात. पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईचं दुंध बाळाचे सुक्ष्मजीव जंतु पासुन संरक्षण करते. अंगावर दुध पाजल्याने बाळाला जठरासंबंधी किंवा पोटाचे विकार उद्‌भवत नाहीत.

स्तनपानाचे तोटे :- 
अल्कोहाल, कॅफिन किंवा औषधामधील काही अनावश्यक घटकद्रव्य स्तनपानातुन बाळाच्या शरीरात गेले तर त्याचे काही दुष्परिणाम हो‍उ शकतात. यासाठी स्तनपानाच्या काळात कॅफिन व मद्य यांचे सेवन मातांनी कमी केले पाहीजे व डॉक्टरांच्या सल्यानुसार मोजकी औषधे घेतली पाहीजेत. काहीतरी काम करत असताना बाळाकडे लक्ष देणे शक्य नसल्यास त्यांच्या तोंडात दुधाची बाटली देणे हे तुलनेने सोपे असते. बाटलीचे दुध ही काही मुलांच्या बाबतीतली एक वाईट सवयच बनून जाते. काही मुल तोंडात दुधाची बाटली ठेवूनच झोपतात. तर काहीनां दुधाच्या बाटलीशिवाय झोपच येत नाही. याचा परिणाम म्हणजे मुलांचे दात लवकर किडतात. कारण दुधात नैर्सगिक शर्करा असते. जिचे आवरण दातावर बसून त्याचा परिणाम दात किडण्यावर होतो.

स्तनपानाच्या वेळा :-
दर तीन तासांनी बाळाला दुधाची गरज भासते. पहिल्या काही आठवड्यात स्तनपानात अनियमितपणा आला तर मुलाला भुक लागते. परंतू जशजशी त्याची वाढ होत जाते. तसतशी त्याची भुकही वाढल्याने स्तनपानात मातेला नियमितपणा आणावा लागतो

बाळाला मालिश करून अंघोळ कशी घालावी

11:51 0 Comments
मातृत्व हे स्त्रीला मिळालेले एक वरदान आहे. कोणत्याही स्त्रीला आपले मूल हे सर्वात प्रिय असते. ह्या छोट्याश्या बाळाची काळजी ती सर्वतोपरीने घेत असते. आपल्या बाळाला कधीच काहीच कमी पडू नये ह्यासाठी ती झटत असते.

जेव्हा बाळ खूप लहान म्हणजे काही दिवसांचे, काही महिन्यांचे असते तोपर्यंत त्याची विशेष काळजी घ्यावी लागते, जसे की कानात वारा न जाऊ देणे, अंगाला मालीश करणे.

मालीश करणे म्हणजे काय तर बाळाचे पूर्ण शरीर तेलाने रगडून काढायचे (फक्त हलक्या हाताने).

आपले बाळ लहान असते, त्याला बोलता येत नाही, मात्र समाजात सगळे असते. स्पर्शाचे बाळाच्या जीवनात फारच महत्व असते. आईचा स्पर्श बाळाला लगेच समजतो. म्हणूनच बाळाचे मालिश ही संवाद साधण्याची एक संधी आहे असे समजून त्याच्याशी बोलले पाहिजे. आपल्या बाळाला आपले हावभाव लगेच समजतात, त्याच्याकडे हसून पाहिले की ते काय करते, रागावून पाहिले की काय करते, ह्या सा-या गोष्टी मालीश करतांना समजून घ्यायच्या असतात.

मालिश कसे करावे?
आपले पाय लांब करून बाळाला आपल्या दोन्ही पायांवर नीट ठेवावे. बाळासाठी आणलेले तेल आपल्या हातांवर घ्यावे. डोक्यावर तेल घासावे, बाळाच्या पायांना, पोटाला, पाठीला, हातांना, चेह-याला सगळीकडे मालीश करावे. अगदी डोळ्यांवरून देखील हलकेच हात फिरवावा. मालीश केल्यानंतर बाळाचे पाय हलकेच बाळाच्या डोक्याला लावण्याचा प्रयत्न करावा. ज्यामुळे बाळाचे शरीर मोकळे होते.

मालिश करण्याची कारणे
१) मालीश केल्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात.

२) मालिश केल्यामुळे बाळाचे वजन वाढत राहते. मुदतपूर्व प्रसुती झालेल्या बाळांच्या संशोधनात असे आढळून आले आहे, की दिवसांतून 3 वेळा 15 मिनिटांसाठी मालिश केली तर यांचे वजन जास्त वाढते.

३) मालिशमुळे बाळ आणि आई-वडिलांमध्ये एक प्रेमळ नाते जुळते. त्यामुळे माता-पित्यांना आपल्या बाळाशी संवाद साधता येतो.

४) मालिश केल्यानंतर बाळ जी झोप घेते ती त्याच्या मेंदूसाठी चांगली असते.

५) मालिशमुळे मुलांच्या पोटाचे विकार उदा. गॅस, कॉलिक आणि अपचन इत्यादी कमी होते.

६) मालिशमुळे मुलांचा मानसिक विकास चांगला होतो.

७) मालिश आणि अन्य उत्प्रेरणामुळे बाळाच्या जाणीवा स्पष्ट होतात. शरीर व मन मोकळे होते. तणाव दूर होतो.

८) जर बाळाच्या अंगावर खूप लव म्हणजेच केस असतील तर तेलामध्ये किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार आंबेहळद एकत्र करून लावावी. आंबेहळद अंगावरील लव कमी करण्यास मदत करते.

मालिश केव्हा करावी?
साधारणपणे सकाळी सकाळी आंघोळ घालण्या आधी मालीश करतात. म्हणजे शरीर तेलकट रहात नाही. व आंघोळ झाल्यावर बाळ नीट झोपल्यामुळे बाळ बाळसे चांगले घेते. मालिश दिवसांतून एक किंवा जास्त वेळा करू शकतो. बाळाला भूक लागलेली असताना किंवा ते थकलेले असतांना किंवा रडत असेल तर मालिश करणे टाळावे. नवजात बाळाला 3-5 मिनिटाच्या मालिशनेही बरे वाटते. दोन महिन्यांहून जास्त मोठ्या बाळाची मालिश जास्त वेळ करता येते.


बाळंतपणा (डिलेव्हरी) नंतरचे व्यायाम

11:31 0 Comments
शरीरातील अनेक स्नायू गरोदरपणात ताणले जातात. नियमित व्यायामाने ते पूर्वस्थितित येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे डाॅक्टरच्या सल्ल्यानेच व्यायामाला केव्हा व कशी सुरूवात करायची हे जाणून घेणे उत्तम.
नैसर्गिक प्रसुती असेल तर सुलभ व्यामानाने सुरूवात करावी व वेळही हळू हळू वाढवत जावी. मात्र सिझेरियन असेल तर १ महिना तरी विश्रांती घ्यावीच. व ३० दिवसांनतर डाॅ. सांगतील तसा व्यायाम करावा.
शरीराला जास्त ताण देऊ नये. दिवसातून थोडा वेळ विश्रांती घ्यावी. पाठीच्या कण्याला वेडावाकडा ताण देऊ नये. त्याकरता बसताना ताठ बसावे. सरळ उभे रहावे. जड वस्तु उचलू नये. एकाच कडेवर मुलांना घेऊन तिरके चालू नये. ८-१० दिवसांनी पोटाचे व पाठीचे व्यायाम टाके भरले असतील शीण गेला असेल तर सुरू करावे.
प्रसुतीनंतर माकडहाडाच्या पोकळीतील स्नायू सैल पडतात. गर्भारपणात चालण्यात, उभे राहण्यात फरक पडलेला असतो. नतर रक्ताभिसरण वाढण्यासाठी व रक्तातील गुठळी टाळण्यासाठी साधे लांब श्वसनाचे व पायांचे व्यायाम करावेत. वस्तु उचलताना गुडघ्यात वाकून उचलावी. डाॅ. शोभा जोगळेकरांनी सांगितलेले काही व्यायामाचे प्रकार पुढच्या पोस्ट मधे सविस्तर टाकते. 

DVD मिळली तर उत्तमच. प्रत्यक्ष पाहून करणे कधिही चांगलेच. तरी काही सोपे प्रकार इथे लिहिते. 
१) जमिनीवर एका अंगावर कुशीवर झोपा. वरचा पाय वर उचला, नंतर खालचापाय आवर उचला, ६ सेकंद तसेच धरा. मग खाली आणा तसेच दुस-या बाजूने करा. 
२) पाठीवर झोपून गुडघे वाकवून घ्या. मान उचलून दोन्ही हात एकदा उजव्या गुडघ्याच्या बाजूला लावा एकदा डाव्या व तसेच ५ सेकंद ठेवा. 
३)जमिनीवर पाठीवर झोपा. गुडघ्यात पाय वाकवा. गुडघे जोडून एकदा डाव्या व एकदा उजव्या बाजूस जमिनीला चिकटून ठेवा. यामुळे मणक्यांना व पोटाच्या स्नायूंना उपयोग होतो व पाठदुखी होत नाही. असेच रहा व गुडले खाली दाबून ठेवून पोट डाव्या व उजव्या बाजूस फिरवा. 
४)खाली जमिनीवर पाठीवर झोपा. गुडघे वाकून पाऊले जमिनीवर ठेवा व हात कोपरात वाकवून छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घ्या व सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर छातीवरील हात वर खाली होतील असे १० वेळा करा. 
५) वरचाच प्रकार हात पोटावर ठेवून करा. पण आता पोटातून श्वास घेतल्याने पोटावरचे हात वर खाली हलले पाहिजेत. १० वेळा करा. 

बाळाचा जन्म...जन्मानंतर चे विधी

11:10 0 Comments
        माणसाच्या जीवनाची सुरुवात त्याच्या जन्मापासून होते.जन्म होण्यापूर्वी त्याची निर्मिती होते आईच्या पोटात.आपल्याकडे  स्त्री गर्भवती राहिली कि तीन महिने पर्यंत त्या गर्भास  मूर्त स्वरूप येत नाही असे समजतात.त्यामुळे  ती स्त्री इतरांप्रमाणेच नित्यनेम  करीत असते.तीन महिनयांनंतर सर्व साधारण असा समज आहे कि ती स्त्री कुठे गेल्यानंतर  तिने ओटी भरून घ्यायची नाही.कारण गर्भवतीची ओटी त्यावेळी भरलेली असते.तिने परत त्या ओटी मध्ये आणखी काही घेऊन पोटातील गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये.ओटी म्हणजे खण,नारळ,तांदुळाने एका सवाष्ण बाईने दुसऱ्या सवाष्ण बाईचा केलेला सन्मान. प्रथम हळद कुंकू लावून (तिसरे बोट कुंकुवाचे व चौथे बोट हळदीचे) खण,नारळ,तांदूळ हातात घेऊन तिच्या पदरात पाच वेळा ओटी ठेवली जाते.जिची ओटी भरतात तिने ओटी भरणाऱ्या स्त्रीस हळद कुंकू लावून नमस्कार करायचा.नव-वधूची ओटी भरताना काही जनांनी आता काहीतरी भेट वस्तू देण्याचा प्रघात  केला आहे.

        पाच महिने झाल्यावर गर्भवती स्त्री मंदिरात सहसा जात नाही.हा प्रघात कदाचित तिचे वेगळे दिसणे आणि नमस्कार करताना होणार शारीरिक त्रास होऊ नये म्हणून पडला असावा.सातव्या महिन्यात ओट भरण करतात.मुलीला माहेरी पहिल्या बाळंतपणासाठी सातव्या महिन्यात आणतात.यास्तव तिचे कोड कौतुक सासरी ओटभरण करून केले जाते.हि प्रथा आता समारंभाच्या स्वरूपात जोर धरू लागली आहे वास्तविक पाहता तिचे शारीरिक श्रम टाळले पाहिजे पण आता कौतुक सोहळा करून घेण्यास ह्या गर्भवतीच पुढे सरसावतात.त्यासाठी वेगळे श्रुंगार करण्यात येतात.वनपरी,शकुंतला,झुला इत्यादी.मात्र ह्यावेळी सर्व श्रुंगार सुगंधी फुलांचा असतो.ओटी भरण्यास येणाऱ्या महिला ह्या वेंळी पाच फळे घेऊन ताटात भरून हातात देतात व मिठाई भरवतात.एक गंमत म्हणून मुलगी किंवा मुलगा ओळखण्यासाठी पेढा व बर्फीच्या वाट्या झाकून ठेवीन त्यातील एक  उचलण्यास सांगतात.पूर्वी शारीरिक हालचालींनी प्रसूती सुलभ व्हायची आता बेडरेस्ट जमान्यात सिझरिंग चे प्रमाण वाढले आहे.
           
बाळंतपण
            पहिले बाळंत पण हा माहेरचा हक्क समजला जातो.कारण आई इतकी जवळची दुसरी कुणीही नसल्याने हा रिवाज पडला असावा आणि तो बरोबरच आहे पूर्वीच्या काळी गावात मोठी घरे असायची  बालन्तिनीची  स्वतंत्र खोली असायची.हेतू एवढाच कि इतरांचा संसर्ग नवजात बालकास होऊ नये. आता जिकडे तिकडे इस्पितळे झाली व गावठी सुवीण हा प्रकार इतिहासजमा होत चालला आहे.मात्र इथे खास नमूद करावेसे वाटते कि अद्याप हि काही गावात इतक्या कुशल सुविनी आहेत कि डॉक्टर सुधा त्यांच्या समोर हात टेकतात.मात्र काही अनिष्ट बाबी त्यांनीटाळल्या पाहिजेत. 

पाचवी 
            मुलाच्या जन्मानंतर पहिला समारंभ येतो पाचवीचा. आता पाचविदेखील इतिहास जमा होत चालली आहे पाचव्या दिवशी मुलास व बालान्तिणीस नरयेलच्या  पाण्याने आंघोळ घातली जाते.काही जणी पाल्याचा रस दोघांच्याही अंगाला चोळतात.बालन्तिणीस  नरयेलाची भाकरी दिली जाते.मागील व पुढील दरवाज्यावर काजरयाच्या खुंट्या मारून बाजूस धूमी केली जाते.मासे पकडण्याचे जाले ज्यास आके म्हणतात, त्यास सभोवार एकवीस धनुकल्या (छोटी धनुष्य)बांधल्या जातात.पेंडकुल्नीच्या  फुलांनी आके सजविले जाते.सायंकाळच्या वेंळी वाजंत्री बोलावून वाजप केले जाते.आक्याच्या खाली सुपात तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवतात.कलशावर केळीचा खोपा(त्रिकोणी शंकू) घालतात.त्याला नाथ वगैरे घालून साज श्रुंगार करतात.त्याला मांड म्हणतात.बालन्तीनीची  नारळाने ओटी भरतात.पहिला मान माहेरचा असतो.तिने त्या कलशाची म्हणजे सटवाईची  पूजा करावयाची असते.मुलाच्या गळ्यात व डाव्या हातात काळा दोरा बांधतात.औषधी वनस्पतीची(वेखंडाची)काडी, सोन्याची सटवी उजव्या हातात.बाळाच्या उशाशी वही व पेन्सिल ठेवली जाते.ज्यावर सटवाई बाळाचे भविष्य लिहिते असा समज आहे.दिवा रात्रभर तेवत ठेवतात.ह्या वेंळी आमन्त्रीतांस घुगऱ्या (उकडलेले काळे वाटणे)वाटतात.अगोदर ह्या  कुलीथांच्या असायच्या, आता काळे वाटाणे वापरतात.जेवण म्हणजे भाताचे बोने( गोलाकार आळे) करून काळ्या वाटाण्याचे सांबारे, शेवग्याच्या पानांची भाजी हा मुख्य मेनू.इतर हौसेने आणखीही काही करतात.पण ते गौण असते.'पाचवीचे बोने  मारुक जाऊया 'अशी म्हणण्याची पध्धत आहे.दुसऱ्या दिवशी पहाटेच आसमंत जागा होण्या पूर्वी हा मांड पळविण्याची पद्धत आहे.बहुधा सुवीण अथवा कुणीतरी  म्हातारी बाई ते सूप घेऊन जाते.तिने त्या दिवशी परतायचे नाही असे सांगितले जाते.

बारसे (नामकरण समारंभ)  
               पाचवी नंतर येतो बारसा. आता हॉल घेऊन बारसे करण्याची   प्रथा  चालू झाली. बाळाच्या   जन्माच्या बाराव्या  दिवशी आंघोळी नंतर त्याच्या हाता पायात बांधलेले काळे दोरे काढून नवीन बांधले  जातात.बाळन्तिनिच्या   घरातील सर्व जन सूवेर   पाळतात.म्हणजे अकरा दिवस देव पूजा व धार्मिक विधी वर्ज्य असतात.आता घराण्यातील विस्तारामुळे काही गावात हा सूवेर तीन दिवसावर आणला आहे.मात्र ज्या घरात बालंतीन त्या घरात अकरा दिवस पाळले जातात.अकराव्या दिवशी सूवेर संपतो  .म्हणजे त्या दिवशी भटजीकडून अथवा मंदिरातून तीर्थ( गोमुत्र) आणून ते घरातील सर्वांनी प्यायचे असते. घरात सडासारवण करतात.
             बाराव्या दिवशी पाळणा फुलांच्या माळानी सजविला जातो.बाळाचे डोके पूर्व-पश्चिम राहील  अशी  मांडणी केली जाते.पाळण्याच्या खाली चार कोपऱ्यांत व मध्यभागी असे पाच विडे ठेवले जातात. त्यावर अथवा त्यास लागून नवधान्याची मांडणी करतात.सर्व मांडणी झाल्यावर गुळगुळीत दगड (ज्याला बाळू म्हणतात)  घेऊन साफ  कपड्यांत ठेवला जातो.त्याला दागिने घालून पाच सवाष्ण बायका त्या बाळूस पालण्यात ठेऊन उचलून पलीकडून पाळण्या खालून घेतात व पाळण्यात टेकवून परत दुसरी फेरी पूर्ण करतात.असे पाच वेळा करतात.नंतर बाळास अंगडे टोपरे घालून पाळण्यात ठेवले जाते.आत्येचा मान नाव ठेवायचा  असतो.तिने नाव ठेवायचे व ढुंगनाणे  पाळन्याला झोका द्यायचा. नंतर पाळणा-गीत म्हटले जाते व पाळण्यास झोके दिले जातात.जुन्या बायका अद्यापही 'शिवरायांचा' पाळणा म्हणतात. नवोदितां साठी  'बाळा जो जो रे'ची केसेट  आहेच. 
            नंतर बाळन्तिणीची ओटी भरली जाते.तेथे देखील माहेरचा मान पहिला असतो.त्यांची ओटी पाच नारळांची असते.पूर्वी मुलगा असला तर पेढे व मुलगी असली तर बत्तासे अथवा बर्फी वाटली जायची .आता सर्रास पेढ्याचेच वाटप होते.भिजवलेले चणे घुगऱ्या म्हणून वाटतात.एखाद्याला उपदेश करायच्या वेळी ' मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत' असे म्हटले जाते.आता व्हिडीओ  शुटींगची पध्दत झाली आहे.पण ह्या तीव्र प्रकाशझोताचा बाळाला किती त्रास होतो याचा कुणी विचारच करीत नाही.
बाळन्तीन साधारण तीन महिने मंदिरात जात नाही.जनसंपर्क टाळण्याचाच तो एक मार्ग होता.आता ह्याबाबत प्रगत जगात  कोणी विचार करीन नाही.

गुढी पाडवा सण मोठा… नाही आनंदा तोटा

10:54 0 Comments


गुडी पाडवा हा हिंदुंचा सण येतोय. मराठी वर्षाचा पहिला दिवस – चैत्र शुद्ध प्रतिपदा – हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वानी पहाटेस उठून सुचिर्भुत होउन देवाची मनोभावे पूजा करावी. व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्‍या, औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. 
नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. 
नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो. 
संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. गुडीवरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.
सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे. 
रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो. 
चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्‍या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!