Follow Us @soratemplates

Monday, 1 July 2013

’प्रिय बाबास’.........

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या विश्वात अगदी गुरफटलेला असतो. मनात असूनही आपण दुस-याला वेळ देऊ शकत नाही. सलील कुलकर्णी व संदीप खरे ह्यांनी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ह्यात एका बाबाची व्यथा मांडली. माझ्या या कवितेत मी सासरी गेलेल्या लेकीची व्यथा मांडायचा प्रयत्न करत आहे. जी खरचं मनात असूनही बाबांसाठी वेळ देऊ शकत नाहीये, आणि हे होत असताना तिच्या मनात होत असलेली घालमेल ह्यातून मांडायचा हा एक छोटासा प्रयत्न...

’प्रिय बाबास’

किती दिस झाले तुला भेटाया ना आले,
प्रपंच्याच्या जाळ्यामध्ये पुरती गुंतले,
फोन येता बाबा नसे बोलायाला वेळ,
रोजचीच ट्रेन दिसे डोळ्याच्या समोर,
बाबाला वाटे रोज लेकीला पहावे,
लेक म्हणे, बाबा मला कसे हे जमावे ?
डोळ्यापुढे येती सारे गेलेले ते दिन
बाबाच्या मायेने ओथंबलेले ते क्षण,
तापलेली लेक जरी आईच्या कुशीत,
रात्रभर जागा बाबा, येरझा-या घालीत .....
मुलांच्या परीक्षा अन कामाचे टेन्शन
दोन्हीमध्ये होई माझी कोण ओढाताण
घरी सदा पाहुण्यांचे येणे आणि जाणे
करताना सारे कसा दिवस मावळे
परि घेता मुखी, तुझ्या आवडीचा घास
आठवाने बाबा येई पाणी ह्या डोळ्यात
पती माझा पुसे राणी काय तुला झाले ?
काही नाही अहो, जरा डोळ्यात खुपले....
कळलेच नाही कधी काळ हा सरला
बालपणासवे कधी धुक्यात विरला
कोषातून तुझ्या कधी बाहेर मी आले,
माझ्या ह्या जगात कधी फुलपंखी झाले
कधी कधी वाटे पुन्हा काळ मागे जावा
मायेच्या कोषात मला दडवून जावा
कमावते आता जरी हजारोंनी दाम
तुझ्या बक्षिसाची आस आजही मनात ....
तुला वाटे लेक माझी, मोठी आता झाली,
बाबाची तिला ना आता गरज उरली
मला वाटे, माझा बाबा पूर्वीचाचा हवा
वार्ध्यक्याचा स्पर्श त्याला कधी ना शिवावा
पण तुझा दमलेला चेहरा दिसता
मनात माझिया किती घरे करतात
नको कधी म्हणू लेक विसरली मला
संस्काराच धन बाबा तूच दिलं मला .....

No comments:

Post a Comment