मॉल मधली विझिट.
शनिवार- रविवारचं कंपल्सरी आउटिंग.
विंडो शॉपिंग करताना
मी एकेक वस्तू
बघते, निरखते, न्याहाळते, हाताळते..
आणि हे सगळंच 'रीच'च्या बाहेर आहे;
असं मनाला समजावून
प्राईस टॅग पाहून ठेऊन देते रॅकवर परत
जागच्या जागी..जसंच्या तसं..जिथे होतं तिथे..
खरं सांगू,
हल्ली फक्त तेव्हाच तुझी आठवण येते !
असंच नव्हतं का केलंस तू?
विंडो शॉपिंग केल्यासारखं
मला बघून, निरखून, न्याहाळून, हाताळून
मी रीचच्या बाहेरच आहे
हे परस्पर ठरवून
ठेऊन दिलंस रॅकवर परत !
जागच्या जागी..जसंच्या तसं..जिथे होते तिथे..
प्राईस टॅग तुला हवा तेव्हा काढलास
पुरे झालं, तसा परत लावलास..
खरंच सांगते,
हल्ली फक्त विंडो शॉपिंग करतानाच
तुझी आठवण येते!
गळ्यातला प्राईस टॅग
फक्त तेव्हाच काचत राहतो..!!
- स्पृहा.

No comments:
Post a Comment