तिसरी गोष्ट....
त्या दोघांचं छान जमलं होतं. दोघंही एकमेकांसाठीच जन्माला आल्यासारखे. एकमेकांवर नितांत प्रेम असणारे. फक्त नंतर जरा गडबड झाली. दोघंही आपापल्या कामात गुंतून गेले आणि एकमेकांकडेही लक्ष द्यायला हवं, हेच विसरले. सुरुवातीला रोजचं फोनवरचं बोलणंही हळूहळू कमी झालं. मोबाइल होते, तरी ते जमेनासं झालं. gm आणि gn अशा शॉर्टफॉर्मपर्यंत पोहोचले. काहीतरी बिघडतंय, हे जाणवलं असेल कदाचित त्यांनाही. फक्त त्याचे परिणाम काय होतील, याची त्यांना कल्पनाच आली नाही.
हळूहळू तर मेसेजही बंद झाले. काय बोलायचं, हे सुचेनासं झालं. मग कधीकधी भांडणं व्हायची कडाक्याची. तू असाच का वागतोस आणि तू अशीच का करतेस याचे दाखले एकमेकांवर फेकले जायचे. तारीख, वार, वेळेसकट पुराव्यांची देवघेव व्हायची.
आपण दोन-दोन महिने भेटत नाही हे जाणवायचं; पण भेटल्यावर इतर काही बोलण्याऐवजी पुन्हा एकदा तारखांची मारामारी सुरू व्हायची.
आपण थांबू या का, असं त्यानं तिला सतरांदा विचारून झालं. तीही वैतागायची. यालाच थांबायची घाई झालेली दिसते, असं वाटायचं. खरंतर तिलाही मनोमन कळत होतं सगळं; पण त्याची समजून घेण्याची वृत्ती नाही, यावर ती ठाम होती.
विचित्र वळणाला येऊन थांबलं सगळं. कारण समोर दिसत होतं. उपायही हातात होता; पण दोघांचंही आपल्याला वेळच नाही आणि समोरचा समजून घेत नाही, या गोष्टीवर अधिक प्रेम होतं.
खरंतर बोलणं सुरू करणं. रोज मेसेज करणं, दोन दिवसांतून एकदा फोन करणं, पूर्वीसारखं रोज नाही जमणार; पण महिन्यातून दोनदा भेटणं हे साधे उपाय होते. त्याविषयी बोलणंही झालं होतं. फक्त हे उपाय अंगवळणी पडत नव्हते. उलट तूच रोज मेसेज केला नाहीस, तूच फोन करत नाहीस, तू कधीही स्वतःहून भेटण्याविषयी बोलत नाहीस, हे नवे आरोप सुरू झाले.
त्यांचं नातं अजूनही हे असंच आहे. सोडवली तर गाठ सुटणारच आहे. ती सुटावी, असं दोघांनाही वाटतं, फक्त गाठ सोडवण्याची, ती सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायची तयारी नाही.
फक्त एकमेकांचे होणं महत्त्वाचं नसतं. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांशी बोलत राहणं, एकमेकांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. त्याचा विचार करायलाच हवा.
-अभिजित थिटे

No comments:
Post a Comment